परळी – कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता बीड जिल्ह्यासह राज्यात लागू असलेल्या संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करत यावर्षीचा गुढीपाडवा (दि.२५) घरी राहूनच साजरा करावा, कोणीही नाहक रस्त्यावर उतरू नये, घरी राहूनच हा लढा यशस्वी करण्याच्या संकल्पाची गुढी सर्वजण उभी करू, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यासह राज्यातील जनतेला गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नवीन मराठी वर्षाचे स्वागत केले जाते. यानिमित्ताने लोक एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी भेटत असतात.
संपूर्ण देशावर कोरोना व्हायरसचे सावट आहे, या भीतीच्या वातावरणात आलेल्या गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह आपण राखून ठेवावा, हे सावट दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सामूहिक आयोजन किंवा भेटीगाठी करू नयेत असे आवाहनही यानिमित्ताने श्री. मुंडे यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या वतीने राज्यात २४ मार्च मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विविध उपाययोजनांसह वारंवार काळजी घेण्याचे व घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी जबाबदारीने त्याला प्रतिसाद द्यावा व परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत शासकीय स्तरावरून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करावे. यावर्षीच्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने एकजुटीने व संयमाने ‘कोरोना’ला परतवून लावू या संकल्पाची गुढी उभारावी असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.
COMMENTS