मुंबई – हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली हे अत्यंत दुर्दैवी आहे. पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा. असे ट्विट करत सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही हे लक्षात ठेवावे असा सज्जड इशाराही दिला आहे.
वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडित महिला शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. हृदयविकाराचा झटका आल्याने पीडितेची प्रकृती खालावली होती, त्यानंतर आज तिने नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या जळीत कांडातील त्या आरोपीविरुद्ध राज्यासह देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
अनेकांनी विविध माध्यमातून त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.सदर खटला हा फास्ट्रॅक कोर्टात चालणार असून सरकार पक्षातर्फे ऍड उज्वल निकम हा खटला चालवणार असल्याचे यापूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान पीडित शिक्षिकेची मृत्यूशी चाललेली झुंज आज अखेर संपली. हे अत्यंत दुर्दैवी असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पीडित शिक्षिकेला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
COMMENTS