बीड – उद्या शुक्रवार दि. १ मे रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना मी वंदन करतो, सध्या कोरोना या वैश्विक महामारीविरोधात सबंध महाराष्ट्र लढतो आहे. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला आज जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे न होऊ देत, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यासाठी अनेक हुतात्म्यांना आपले रक्त सांडावे लागले, त्या सर्व हुतत्म्यांना नमन करून कामगार चळवळी मध्ये योगदान दिलेल्या सर्वांना नतमस्तक होऊन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो, असे मुंडेंनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
कोरोना विरुद्ध सगळे जग लढत आहे. महाराष्ट्राची लढाई निर्णायक टप्प्यात आली असून रुग्णांचा आकडा आता १० हजारच्या पार जातोय, या परिस्थितीत राज्य शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत असून, आरोग्य विभाग, पोलीस विभाग यासह सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. समाजातील अनेक संस्था व अन्य घटक शासनाच्या बरीबरीने गरजूंना अन्न – धान्यासह विविध प्रकारची मदत करत आहेत. एवढेच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटक शासकीय सूचनांचे पालन करत आपापल्या परीने कोरोनाविरुद्ध लढत आहे.
कोरोना विरुद्ध च्या लढ्यात महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने दिलेले हे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल; महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र निर्मितीसाठी लढा दिलेल्या सर्वांसमोर नतमस्तक होऊन राज्य कोरोनामुक्त होण्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बीड जिल्ह्याचा ‘शून्य’ कायम राखण्याचे आवाहन
बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसला तरी या पुढील काही दिवस आपल्याला अशा प्रकारे काळजी घ्यावी लागणार असून, आपलेच बांधव म्हणून परत आलेले ऊसतोड कामगार यांचीही काळजी करावी काळजी घ्यावी. बीडचा ‘शून्य’ अबाधित ठेवण्याच्या या लढ्यात प्रत्येक जिल्हावासीयांनी योगदान द्यावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.
COMMENTS