मुंबई – सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यलयातील अधिका-याने पैसे घेऊनही काम केलं नाही. त्यामुळे मंत्रालयातच या अधिका-याची धुलाई करण्यात आली आहे. उस्मानाबादमधील अरुण निटुरे यांनी या अधिका-याला मारहाण केली आहे. आश्रम शाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अणुदानित करण्यासाठी निटुरे यांनी पैसे दिले आहेत. परंतु पैसे घेऊनही अधिकारी काम करत नसल्यामुळे त्यांनी या अधिका-याला मारहाण केली आहे.
दरम्यान या घटनेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारमधील मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत.लोक उघड उघड पैसे दिल्याचे सांगून मंत्र्यांच्या दालनात जाऊन जाब विचारत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरून मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होत आहे. हे राज्य भ्रष्टाचाराच्या बाबतीत किती पुढे गेले आहे हे स्पष्ट होत असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पैसे घेऊन काम करणारा कर्मचारी व मंत्री यांचा काही संबंध आहे का ? ज्या आश्रमशाळेच्या मान्यतेसाठी व अनुदानासाठी पैसे घेतले त्याच प्रमाणे आतापर्यंत श्री बडोले यांच्या कार्यकाळात मान्यता दिलेल्या आश्रमशाळा आणि अनुदान हे पैसे देऊन केले का याची ACB चौकशी करण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
COMMENTS