मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

मुंबई- शासनाने मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी आ.जयवंत जाधव यांच्यासह त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून या बाबतचे निवेदन दिले आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत मराठवाड्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झालं असल्याचं यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राज्यात विशेषतः मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असून टँकरची मागणी ग्रामस्थ करत आहेत. शासन स्तरावर मात्र दुष्काळी परिस्थिती बाबत कोणालाही गांभीर्य दिसून येत नसल्याचा आरोप मुंडेंनी केला आहे. तसेच मराठवाड्यातील दुष्काळाबाबत त्यांनी यावेळी सविस्तर चर्चा करून पंधरा दिवसांत दुष्काळ जाहीर करावा अन्यथा लोक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशाराही मुंडे यांनी यावेळी दिला आहे.

मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहिर करावा, पिकांचे पंचनामे करून आनेवारी जाहिर करावी, ग्रामीण भागात मागणीनुसार टँकर उपलब्ध करून टँकर मंजुरीसाठी सध्याच्या अटी शिथिल कराव्यात, बोंडअळी अनुदान, पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम आदी थकीत शासकीय अनुदानाचे तात्काळ वाटप करावे, चारा डेपो आणि चारा छावण्या सुरु कराव्यात, जायकवाडी धरणाच्या कालव्यातून शेतकर्‍यांना किमान पाच पाणी पाळ्यांचे नियोजन करावे, पिक कर्ज व इतर वसुलीला स्थगिती द्यावी यासह विविध मागण्यांचे लेखी निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झाला असून त्याला दिलासा देण्यासाठी शासनाकडून तातडीची उपाययोजना होणे गरजेचे आहे. सध्या शेतकर्‍यांमध्ये शासन विरोधी तीव्र असंतोष असून पंधरा दिवसांत दुष्काळ जाहीर होवून या बाबतच्या उपाययोजना न झाल्यास लोक सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतील असा इशाराही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

COMMENTS