आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कारटं का, तुमचं मग काय होतं ? – धनंजय मुंडे

आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कारटं का, तुमचं मग काय होतं ? – धनंजय मुंडे

रहिमतपुर ( सातारा ) – आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं कारटं का? तुमचं मग काय होतं. आमच्या गठबंधनाला ठगबंधन सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत अहो तुम्ही देशातील १२५ कोटी जनतेला ठगवलं आहे त्याचं काय? असं जोरदार प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी रहिमतपूरच्या जाहीर सभेत दिले.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या दुसर्‍या दिवसातील पहिली सभा सातारा जिल्ह्याच्या रहिमतपूर येथे सभा पार पडली.जालनाच्या कालच्या सभेतल्या वायरल झालेल्या एका व्हिडीओत भाजपचे कार्यकर्ते झोपलेले दिसले. यांना झोपेतसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच दिसत असावी. त्यांच्या अधिवेशनात फक्त राष्ट्रवादीचीच चर्चा होती. मुख्यमंत्रीही विकासाबाबत न बोलता परिवर्तनयात्रा वगैरे माहिती नाही असं म्हणाले. या रिंगणात तुम्हाला माहिती देतो असे आव्हान मुंडे यांनी दिले.

भाजपने रहिमतपूर आणि सातारा जिल्ह्यात कितीही कमळांची चित्रे काढून भिंती रंगवल्या तरी त्याचा काही उपयोग नाही. भाजपचे येथे भिंती रंगवणे म्हणजे काळ्या पाषाणावर डोकं फोडल्यासारखं आहे. कारण येथील जनता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच बाजूने उभी राहिल असा विश्वास व्यक्त केला.२ कोटी नोकर्‍या देणार म्हणून आजची ही तरुणाई ‘हर हर मोदी घर घर मोदी’ म्हणत उड्या मारत होती. परंतु साडेचार वर्षांत नोकरीच्या आमिषाने तरुणाला फसवलं हे लक्षात आल्यावर आज हिच तरुणाई साधी सोयरीकही जुळली नाही असे सांगत आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. मराठ्यांना आरक्षण दिल्याचे सांगत फक्त जाहिरात केली. मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही. अरे किती फसवणार आहात जनतेला असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.दिवसाढवळ्या जनतेच्या पैशाची लूट केली ते भाजपवाले कुठल्या तोंडाने मत मागायला येणार आहेत अशी विचारणाही धनंजय मुंडे यांनी केली.सभेला येण्यापूर्वी रहिमतपूर शहरातून बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, आयटी सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, महिला जिल्हाध्यक्षा समिधा जाधव, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, आदींसह रहिमतपूर, पाटण, कोरेगाव, कराड येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS