बीड – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भव्य विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत १ ऑक्टोबर रोजी बीड येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
दरम्यान बीड जिल्हा हा पवार साहेबांच्या आणि पुरोगामी विचारांना मानणारा आहे. म्हणूनच या जिल्ह्याने यापूर्वी ६ पैकी ५ जागांवर विजय मिळवला होता या इतिहासाची पुनरावृत्तीच नव्हे तर लोकसभेसह जिल्ह्यातील सहाही जागा जिंकण्याचा संकल्प करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
ही सभा न भूतो न भविष्यती आणि विक्रमी व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. श्री जयंत पाटील हे ही उपस्थित राहणार आहे. या सभेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रश्न मांडण्यात येणार आहेत. आज जिल्ह्यात पाऊस नाही, शेतकर्यांची पिके पाऊसा अभावी गेली आहेत. या पिकांचे पंचनामे करण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. व्यापारी संप सुरू असल्याने शेतकर्यांना मुग, उडीद हे कुठे विक्री करावे असा प्रश्न पडला आहे. खरेदी केंद्र नाहीत, बोंडअळीची नुकसान भरपाई मिळत नाही, पिक मिळत नाही, यामुळे महागाई प्रचंड वाढली आहे. सर्वसामान्य माणुस त्रस्त झाला आहे. पेट्रोल-डीझेल, गॅसच्या किंमती दररोज वाढत आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या असा अंतिम इशारा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले.
या कार्यक्रमा आधी दि.३० सप्टेंबर रोजी पवार साहेब बीड येथे मुक्कामी येणार असून, त्यांच्या हस्ते युवक नेते संदिप क्षीरसागर यांच्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे उद्घाटन होणार असल्याचेही श्री.मुंडे यांनी सांगितले. या मेळाव्याच्या तयारीसाठी पत्रकार परिषदेनंतर त्यांनी बीड आणि गेवराई येथे कार्यकर्त्यांचे मेळावेही घेतले.
यावेळी माजी मंत्री श्री.प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडीत, सौ.उषाताई दराडे, श्री.राजेंद्र जगताप, श्री.सय्यद सलीम, श्री.पृथ्वीराज साठी, जिल्हाध्यक्ष श्री.बजरंग बप्पा सोनवणे, युवक नेते श्री.संदिप क्षीरसागर, श्री. विजयराजे पंडीत, ऍड श्री. डी.बी. बागल, श्री.फारूख भाई पटेल, श्री.सतिश शिंदे, श्री.बबनदादा गवते, श्री.महेंद्र रोडे, श्री.धैर्यशील सोळंके, व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS