‘हा’ दोष मंत्रीमहोदयांच्या ज्ञानाचा आहे, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला !

‘हा’ दोष मंत्रीमहोदयांच्या ज्ञानाचा आहे, धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला !

मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. बेबी केअर किट खरेदीवरुन त्यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे. मूल जन्माला येण्याआधी ते ‘नकटं’ आहे हे सांगण्याची विरोधी पक्षनेत्यांना सवय जडली आहे, अशी टिका महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. यावर उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी “जन्माला येणारं मूल नकटं आहे की नाही हे कळू शकत नाही. परंतु मूलामध्ये शारिरिक व्यंग असेल तर तज्ञ डॉक्टर मूल जन्माला येण्याआधी ते सांगू शकतात. तज्ञांनी वेळीच दिलेल्या सल्ल्याने उपचार घेता येतात. त्याच भूमिकेतून बेबी केअर किट खरेदी योजनेत कोणत्या त्रुटी आहेत त्या कशा दूर करता येतील, हे जबाबदार विरोधी पक्षनेत्याच्या नात्याने मी वेळीच सरकारच्या लक्षात आणून दिले.”

“मंत्रीमहोदयांनी माझी सूचना सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकारायला हवी होती, परंतु त्या रागावल्या. त्यांच्या योजना अपयशी होणार हे मला आधी कळतं आणि महिला व बालविकासमंत्र्यांना योजना अयशस्वी झाल्याशिवाय कळत नाही, हा दोष मंत्रीमहोदयांच्या ज्ञानाचा आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान लाभार्थ्यांपेक्षा कंत्राटदारांचे हित नजरेसमोर ठेवून योजना आखल्याने सरकारी योजना अयशस्वी होत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. “राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या सॅनिटरी नॅपकीन, चिक्की पुरवठ्यासारख्या योजना केवळ भ्रष्टाचारामुळे अयशस्वी ठरल्या किंवा मागे घ्याव्या लागल्या आहेत.

नवजात अर्भकांसाठीची “बेबी केअर किट’ योजनाही त्याच मार्गाने चालल्याने, बालकांच्या आरोग्याच्या हितासाठी त्यातल्या ‘त्रुटी’ मी लक्षात आणून दिल्या. ही योजना पूर्ण अभ्यासाअंती व आरोग्य विभागामार्फत राबवावी, अशी सूचना मी केली होती. त्यात महिला व बालकल्याण मंत्र्यांना राग येण्याचं कारण काय?,” असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

COMMENTS