पंतप्रधान मोदींची अवस्था गजनीतल्या आमीर खानसारखी – धनंजय मुंडे

पंतप्रधान मोदींची अवस्था गजनीतल्या आमीर खानसारखी – धनंजय मुंडे

पालघर ( विक्रमगड ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गजनी चित्रपटातल्या आमिर खानसारखे झाले आहेत, त्या चित्रपटात जशी आमिर खानची स्मृती जाते तसाच मोदी यांना 2014 मध्ये त्यांनी केलेल्या भाषणाचा त्यांनाच विसर पडला आहे असा हल्ला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या संकल्प यात्रेच्या चौथ्या दिवसाच्या विक्रमगड ( जिल्हा पालघर ) येथील पहिल्या सभेत ते बोलत होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीचा काल समारोप झाला, त्यात मोदी म्हणाले की आम्हाला गर्व आहे की आम्ही भ्रष्टाचार मुक्त शासन दिले त्यावर मोदीजी सांगा व्यापम क्या था ? ललित गेट काय आहे ? राफेल काय आहे ? तुमच्या महाराष्ट्रातील 16 मंत्र्यांनी तर राज्यातील जनतेला कोटीच्या कोटी रुपयांनी लुटले. कुठे गेला तुमचा भ्रष्टाचार मुक्त भारत ? असा प्रतिसवाल करत मोदींच्या भ्रष्टाचार मुक्त सरकारची मुंडे यांनी पोलखोल केली.

मुख्यमंत्री म्हणाले होते की भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र देऊ, पारदर्शक कारभार देऊ, मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र दिला यांनी नव्वद हजार कोटी रुपयाला महाराष्ट्र लुटला अशी टीका मुंडे यांनी केली.

मोदीजी, मै़ चौकीदार हु जो सोता नही चोरोको पकडता हु असे म्हणतात मग ललित मोदी, विजय मल्ल्या, चोस्की कसे पळाले असा सवाल केला.

मोदींच्या भक्तांनी जर मोदींना त्यांचीच २०१४सालची भाषणं ऐकवली तर मोदी स्वतःच प्रचारासाठी बाहेर पडणार नाहीत. २०१४ सालच्या लाटेत देशाचं, राज्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र आता यांची वाट लावल्याशिवाय जनता शांत बसणार नाही असा इशारा मुंडे यांनी दिला.

आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वात जास्त कुपोषित बालकांची संख्या आहे हे राज्याचं दुर्दैव. कुपोषित बालकांना मिळणाऱ्या साहित्यात घोटाळा करणाऱ्यांना जर लहान लेकरांचे रडणे ऐकू येत नसेल तर मी म्हणतो यांचा मेंदूच कुपोषित झाला आहे असा प्रहार मुंडे यांनी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांच्यावर केला.

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जयदेव गायकवाड, आमदार पांडुरंग वरोरा, आमदार आनंद ठाकूर, सुनील भुसारा विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS