…यासाठी  पवार साहेबांकडे आग्रह करणार-धनंजय मुंडे

…यासाठी पवार साहेबांकडे आग्रह करणार-धनंजय मुंडे

परभणी – मराठवाड्यातील खेळाडुंमध्ये मोठी गुणवत्ता आहे. मात्र त्यांना हवा तसा वाव मिळत नाही. मराठवाड्यातील चांगल्या क्रिकेटपटुंनाही संधी मिळावी यासाठी स्वतंत्र रणजी संघाची आवश्यकता आहे. मराठवाड्यालाही रणजीचा दर्जा मिळावा यासाठी आपण खासदार  शरद पवार साहेबांच्या माध्यमातुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित मराठवाडा पातळीवरील विभागीय क्रिकेट स्पर्धेचे (पाथरी प्रिमियर लिग) चे उदघाटन श्री.मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी संध्याकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमास आ.बाबाजाणी दर्राणी, आ.विजयकुमार भांबळे, आ.डॉ.मधुसुदन केंद्रे, श्री.राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आ.नखाते, युवक नेते अजय मुंडे, परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, संयोजक जुनैदभाई दुर्राणी आदी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी काही वेळ फलंदाजी करून या स्पर्धेचे उदघाटन केले.

सेलु जि.परभणी येथेही पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित राज्यस्तरीय किशोर कबड्डी स्पर्धांचे उदघाटनही मुंडे यांच्या हस्ते झाले. क्रिकेट प्रमाणेच खो-खो चा खेळ ही आपल्याला आवडतो असे सांगतानाच खो-खो असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार हे  या खेळाला गतवैभव आणि प्रतिष्ठा मिळवुन देतील असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.

राजकारणातही कबड्डीचा खेळ सुरू असतो, मात्र या खेळाप्रमाणे आपल्याला पाय खेचाखेची राजकारणात आपल्याला कधीच जमली नाही. आपण नेहमीच सरळ राजकारण करतो अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

COMMENTS