मोदी लाट ओसरल्यामुळे शासकीय खर्चाने माणसे आणावी लागतायत – धनंजय मुंडे

मोदी लाट ओसरल्यामुळे शासकीय खर्चाने माणसे आणावी लागतायत – धनंजय मुंडे

मुंबई –  पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांच्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील लाभार्थ्यांना मोफत बससेवा दिली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून या लाभार्थ्यांना आणलं जाणार आहे. कार्यक्रमाला 5 जिल्ह्यातून माणसे आणण्यासाठी ग्रामविकास खाते 2 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. कार्यक्रमाला येणा-या लोकांना न्याहरी, येण्या जाण्याची सोय आणि बसेस वर बॅनर लावण्यासाठी हा खर्च केला जात आहे. 20 हजार घरकुल लाभार्थी त्यांचा कुटुंबियांसह असे 40 हजार  लोक उपस्थित राहण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

खालील जिल्ह्यातून बसेस आणणार

नाशिक 20 हजार लोक बसेस 400

नगर 12 हजार लोक बसेस 240

औरंगाबाद 4 हजार लोक बसेस 80

बीड 2 हजार लोक बसेस 40

पुणे 2 हजार लोक बसेस 40

एकूण 800 बस मधून 40 हजार लोक येणार त्यासाठी ग्रामविकास विभागाने 2 कोटी रक्कम मंजूर केले आहेत.

दरम्यान हा सर्व खर्च सरकारच्या तिजोरीतून केला जाणार असल्यामुळे धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. याबाबतचं ट्वीट मुंडे यांनी केलं असून राज्य दुष्काळात होरपळत आहे,तिजोरीत खडखडाट आहे आणि राज्य कर्जबाजारी झाले असतांना यांच्या शिर्डीत होणा-या कार्यक्रमाला गर्दी जमा करण्यासाठी शासकीय तिजोरीतून 2 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मोदी लाट पूर्णपणे ओसरली असल्यानेच शासकीय खर्चाने माणसे आणावी लागत असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

तसेच पंतप्रधान आवास योजनेवरही मुंडे यांनी टीका केली असून मुळात पंतप्रधान आवास योजना ही पूर्वीच्या इंदिरा आवास योजना व इतर काही योजनांचे एकत्रिकरण करून करण्यात आली आहे. ती ही नीटपणे राबवली नाही म्हणूनच लाभार्थी शोधण्याची वेळ आली आहे. खोटे लाभार्थी पंतप्रधानांना दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत असंही ट्वीटही मुंडे यांनी केलं आहे.

सरकारच्या कोणत्याच योजना जनतेपर्यत प्रत्यक्ष पोहचत नाहीत, त्यामुळे खोटा प्रचार करण्याचा धंदा सुरू आहे. आता निवडणूक जवळ आल्यामुळे शासकीय अनुदानाचा वापर खोटे बोलण्यासाठी केला जात असल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.

COMMENTS