उस्मानाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेसाठी उस्मानाबादला निघालेले विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रस्त्यात अपघात झालेल्या एका मोटारसायकल स्वारास वेळीच मदत करून त्याचा प्राण वाचवला आहे. कळंब ढोकी रस्त्यावर पिंपळगाव वाटीजवळून जात असताना रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या दुचाकीस्वारास त्यांनी मदत केली आहे. उस्मान शेख निपाणी असं या ४५ वर्षीय इसमाचं नाव असून दुचाकीच्या अपघातात ते जखमी झाले आहेत.
दरम्यान उस्मान शेख निपाणी हे मोटारसायकलवरून जात असताना रस्त्यात आलेल्या म्हशीची मोटारसायकलला जोराची धडक बसली यात ते जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून मोठा रक्तस्त्राव होत होता. त्याचवेळी कळंबहुन उस्मानाबादकडे जात असलेल्या धनंजय मुंडे यांनी रस्त्यावरील जखमी व्यक्तीस पाहून गाडी थांबवली व स्वतः खाली उतरून त्या जखमी व्यक्तीची पाहणी केली. तसेच सोबतच्या पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस गाडीमधून तातडीने त्यांनी उस्मान यांना उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल केले. उस्मान यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.
COMMENTS