राज्यातील ऊसतोड कामगारांना दिलासा, धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांनंतर स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा !

राज्यातील ऊसतोड कामगारांना दिलासा, धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांनंतर स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा !

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, बीड, नगरसह अन्य भागातील ऊसतोड कामगारांना आता स्वगृही परतता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बीड , नगर जिल्ह्यासह अन्य भागातील असंख्य ऊसतोड कामगार उसतोडणीला पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागासह इतरत्र अडकलेले आहेत, ज्यांचे कारखाने बंद झालेले आहेत अशा कामगारांना कारखान्याच्या एम. डी. किंवा शेतकी अधिका-याचे पत्र घेऊन स्वगृही परतता येणार आहे.

तसेच ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम बाकी आहे तेथील ऊसतोड कामगारांची निवारा, आरोग्य तपासणी व उदरनिर्वाहासाठी आवश्यक अन्न-धान्य आदी सुविधा कारखाना प्रशासन व राज्य सरकारकडून करण्यात येणार आहेत.

एक लाखांहून अधिक ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागात अडकले असून कोरोना व्हायरस व लॉककडाऊनमुळे त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न उभे राहिले होते, याच पार्श्वभूमीवर फोन व विविध माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अनेकांनी याबाबत विनंत्या व तक्रारी केल्या होत्या.

धनंजय मुंडे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे यशस्वी पाठपुरावा केला आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ निर्णय घेऊन पुण्याचे विभागीय आयुक्त श्री. म्हैसकर यांच्याशी संपर्क करून हा निर्णय घेतला याबाबत या कामगारांना घरी परततांना कोठेही अडवले जाणार नाही याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडून निर्देश दिले जाणार आहेत तर चालू कारखान्यावर कामगार यांची सोय करण्याबाबत साखर आयुक्त यांना याबाबत निर्देशित केले जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या निर्णयानुसार गळीत हंगाम बंद झालेल्या कारखाना प्रशासनाकडून लेखी पत्र घेऊन संबंधित ऊसतोड कामगारांना आपापल्या गावी परत येता येणार आहे.

तसेच ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम बाकी आहे तेथील ऊसतोड कामगारांच्या निवारा, आरोग्य तपासणी, अन्नधान्य पुरवठा याबाबतची व्यवस्था कारखाना प्रशासनाने राज्य शासनाच्या मदतीने करावी असेही अजित दादा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाद्वारे निर्देशित करण्यात आले आहेत.

असंघटित व असुरक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची संख्या लक्षात घेता, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव व उदरनिर्वाह अशा समस्या बाबत चिंता व्यक्त केली जात होती.

त्याअनुषंगाने धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांच्याकडे याबाबत यशस्वी पाठपुरावा केल्यामुळे एक लाखांहून अधिक ऊसतोड कामगारांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.

धनंजय मुंडे यांनी ज्या जिल्ह्यातील कारखाने बंद आहेत किंवा चालू आहेत त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी ही याबाबत संपर्क करून कामगारांबाबत आणि त्यांच्या अडचणी बाबत व घेतलेल्या निर्णयांची माहिती देऊन सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची जबाबदारी नुकतीच कामगार विभागाकडून धनंजय मुंडे मंत्री असलेल्या सामाजिक या विभागाकडे आली आहे. या मंडळाचे काम अद्याप सुरू झालेले नसले तरी मुंडे यांनी मात्र आपल्या ऊसतोड बांधवांसाठी संकटाच्या समयी धावून येत त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.

COMMENTS