कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा एल्गार परिषद शनिवारी कोल्हापुरात पार पडली. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काही नेते धनंजय महाडिक यांच्याविषयी काही बोलत आहेत त्यांनी तसे बोलू नये अशी तंबी त्यांनी महाडिक यांच्यावर टीका करणा-या पक्षातल्या नेत्यांना दिली. उमेदवारीबात पवारसाहेब काय निर्णय घेतली ते घेतील. तो अंतिम निर्णय असेल. पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यासह काही नेत्यांनी महाडिक यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अनेकवेळा त्यांनी तो बोलूनही दाखवला आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या महाडिकांविषयीच्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे.
धनंजय महाडिक हे गेल्या साडेचार वर्षात राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील कार्यक्रमाला कधीच हजर राहिले नाहीत. केवळ शरद पवार असतली तरच ते त्यांच्या कार्यक्रमाला हजर राहत असत. अजित पवारांच्या कार्यक्रमालाही ते यापूर्वी हजर राहत नसत. काल मात्र युवा एल्गार परिषदेच्या कार्यक्रमला महाडिक यांनी हजेरी लावली. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांची कोल्हापुरची उमेदवारी धनंजय महाडिकांना निश्चित केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खासदार झाल्यापासून जिल्ह्यात ज्या काही निवडणुका झाल्या त्यावेळी महाडिक यांनी प्रत्येकवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम केले आहे. मग जिल्हा परिषदेची निवडणूक असो, महापालिकेची असो, नगरपालिकेची असो किंवा विधान परिषदेची निवडणूक असो. प्रत्येक वेळी धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अगदी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीच्यावेळी तर भाजप आणि ताराराणी आघाडीच्या सदस्यांच्या गाडीचे सारथ्य त्यांनी केलं होतं. त्यावेळी तो फोटो चांगलाच गाजला होता. असं असतानाही राष्ट्रवादीनं महाडिक यांना झुकतं माप दिल्याचं दिसून येतंय. महाडिक यांची ताकद आणि जिंकूण येण्याची क्षमता यामुळे पुन्हा राष्ट्रवादी त्यांनाच तिकीट देण्याची चिन्हे आहेत. मात्र गेल्या चार वर्षात महाडिक यांना विरोध करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसचे सतेज पाटील आता काय भूमिका घेतात ते पहावं लागेल.
COMMENTS