मुंबई – सिंचन घोटाळ्यासाठी अजित पवार जबाबदार आहेत असं कुठेही शपथपत्रात म्हटलेलं नसल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. अजित पवारांनी बिझनेस ऑफ रुलच्या नियम 10 आणि 14 च्या अधिन राहून काम केलं असल्याचं स्पष्टीकरणही मुंडे यांनी दिलं आहे. त्यामुळे त्या नियमांचे उल्लंघन करून त्यांनी काम केलेलं नाही. मंत्री म्हणून जी जबाबदारी आहे ती त्यांनी योग्य रीतीने पार पाडली असल्याचंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान निविदा कशा काढल्या, काम कोणाला दिले, त्याची कागदपत्र हे बघण्याचं काम मंत्र्यांचं नसतं, ते काम अधिकाऱ्यांचा असतं. प्रतिज्ञापत्रात अधिकारी जबाबदार आहेत असं म्हटलं आहे. सचिवांनी सांगितले असते आणि ते डावलून अजित पवारांनी केलं असतं तर नक्कीच दादा दोषी असते असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
तसेच अजित पवारांनी सचिवांचे म्हणणे डावलून काम दिलेले नाही. आम्ही या सरकारमधील 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड केले आहेत. या मंत्र्यांनी सचिवांनी सुचवलेलं डावलून आणि नियमांचे उल्लंघन करून 300-300 कोटींची कामे दिली आहेत. आम्ही त्याबाबत एसीबीकडे तक्रार केली आहे पण त्यात एसीबी काहीही करत नसल्याचा आरोपही मुंडे यांनी केला आहे.
तसेच या प्रतिज्ञापत्राचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. मराठा आरक्षण, दुष्काळ यावर सरकारने काही केले नाही यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या मुद्द्याचा सरकार वापर करत आहे. मागील अधिवेशनातही सरकार अडचणीत असताना अजितदादांबद्दल अशा बातम्या आल्या होत्या असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
COMMENTS