नाराज मोहिते-पाटील आता धरणार काँग्रेसचा हात

नाराज मोहिते-पाटील आता धरणार काँग्रेसचा हात

सोलापूर : महाराष्ट्रातील राजकारणात अनेक दशकांपासून दबदबा असलेल्या घराण्यांमध्ये अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबाचा वरचा क्रमांक लागतो. मात्र, या घराण्यात भावबंदकीही नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. विजयसिंह आणि प्रतापसिंह या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष होता. प्रतापसिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या दुसरी पिढीनेही हा वारसा कायम ठेवला असून दोन कुटुंब एकमेकांवर शह-काटशहाचे राजकारण करताना दिसतात. सध्या राष्ट्रवादीसोबत असलेले एक मोहिते-पाटील घड्याळ सोडून काँग्रेसचा हात धऱणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत.
सुरुवातीला अनेक वर्षे शिवसेनेत राहिलेले डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे यांची विशेष मर्जी होती. मात्र भाजपच्या साथीला शिवसेनेला राहावे लागल्याने धवलसिंह याना सेनेतून म्हणावा तास न्याय मिळाला नव्हता. यानंतर आमदार रणजितसिंह यांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केल्यावर, डॉ धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते.

शरद पवारांच्या सल्ल्याने त्यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. अतिशय कमी मतांच्या फरकाने भाजपच्या राम सातपुते यांचा विजय झाला होता. मात्र यानंतरही राष्ट्रवादीत धवलसिंह यांना पक्षात दुर्लक्षित केल्याच लक्षात येऊ लागताच त्यांनी थेट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. स्वत: डॉ धवलसिंह यांनी याला दुजोरा दिला आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. शिवाय मागील महिन्यात नरभक्षक बिबट्याला मारल्यामुळे त्यांच्या इमेज बिल्डिंगमध्येही मदत झाली होती.

COMMENTS