धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान, अचारसंहिता लागू !

धुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान, अचारसंहिता लागू !

मुंबई – धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली आहे.

सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे.  एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत.  अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.

अहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

दोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

 

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे – 13 ते 20 नोव्हेंबर 2018

नामनिर्देशनपत्रांची छाननी – 22 नोव्हेंबर 2018

उमेदवारी मागे घेणे – 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत

निवडणूक‍ चिन्ह वाटप – 27 नोव्हेंबर 2018

मतदान – 9 डिसेंबर 2018

मतमोजणी – 10 डिसेंबर 2018

निकालाची राजपत्रात प्रसिद्धी – 13 डिसेंबर 2018 पर्यंत

COMMENTS