“एमआयएमचा काळा इतिहास असल्यामुळे ओवेसींना मानपत्र देण्यास विरोध !”

“एमआयएमचा काळा इतिहास असल्यामुळे ओवेसींना मानपत्र देण्यास विरोध !”

सोलापूर  एमआयएमचा काळा इतिहास असल्यामुळे पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव सोलापूर महानगरपालिकेने फेटाळला आहे. आज झालेल्या सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव बहुमताने फेटाळून लावण्यात आला आहे. महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आजची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी ओवेसींना मानपत्र देण्याचा सभासद प्रस्ताव मांडला होता. परंतु शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी या पक्षाचा इतिहास सभागृहासमोर मांडला. राष्ट्रद्रोहाचं काम केलेल्या पक्षाच्या प्रमुखाला मानपत्र देण्यास विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान ओवेसी यांनी सोलापूरसाठी कोणतंही उल्लेखनीय काम केलेलं नसून त्यांना मानपत्र देता येणार नाही, अशी उपसूचना भाजपने मांडली़ होती. ओवेसी हे उच्चशिक्षित आणि बुद्धिमान आहेत. परंतु एमआयएमच्या स्थापनेचा इतिहास पाहता मानपत्र देण्यास आमचा विरोध असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे.

दरम्यान एमआयएमचे तौफिक शेख यांनी  एका पक्षप्रमुखांच्या कार्याची नोंद घेण्याची मागणी केली होती. संसदेतील त्यांच्या कार्याची दखल घेऊन मानपत्र देण्याचा  विचार व्हावा अशी विनंती  सभागृहाला केली.  अखेरीस बहुमताने ओवेसी यांना मानपत्र देण्याचा ठराव फेटाळण्यात आला असल्यामुळे एमआयएमच्या सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

COMMENTS