मुंबई – एसटी महामंडळातील कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणा-या अधिका-यांना आता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी खास गिफ्ट दिलं आहे. कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणा-या अधिका-यांच्या वेतनश्रेणीचा कालावधी ३ वर्षांवरुन १ वर्षावर आणण्यात आला आहे. दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने नियमीत वेतन देण्यात येणार असल्याचं रावते यांनी म्हटलं आहे.
एसटी महामंडळात नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत पहिली ३ वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. परंतु मा. परिवहन व खारभूमी विकास मंत्री, तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी सन २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीतील सर्वच कर्मचाऱ्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी ३ वर्षावरुन १ वर्षे करण्यात येणार असून पहिल्या ६ महिन्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला रु. ५०० वेतनवाढ देण्यात येणार आहे. तसेच वर्षभर समाधानकारक काम केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुढील वर्षांपासून नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार एसटीत कार्यरत असलेल्या सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांपैकी विविध २५ संवर्गातील मिळून १२ हजार ५१४ कनिष्ठ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला असून १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्यांचे सुधारित वेतन देण्यात येणार आहे.
COMMENTS