सध्या आपल्या देशात कोरोनापेक्षा मोठं भूत जनतेच्या मानगुटीवर बसलंय, ते म्हणजे आत्महत्येचं. सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली आणि सगळा देश कोरोनाच्या महामारीचं दु:ख विसरून त्याच्या जाण्यावर चर्चा रंगवण्यात आणि आपले अंदाज ठरवण्यात व्यस्त झाला. म्हणजे सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली नसती तर, संपूर्ण भारत कोरोनाच्या विळख्यात सापडला असता परंतु त्या एका हत्येने लोकांना जागृत केलं आणि आपली मत मांडण्यासाठी घरात डांबून ठेवलं. त्यानंतर काही दिवसांनी परतीच्या पावसाबरोबर ‘कंगना राणावत’ हिच्या वादग्रस्त विधानांनी शेतक-यांची दु:ख हलकी केली आणि प्रत्येकाने तिच्या बाजूने अथवा तिच्या विरोधात टिपणी द्यायला सुरवात केली. यात कसाबसा दसरा सरला आणि मुख्यमंत्र्यांनी “बेडकांचं साम्राज्य” म्हणत पुन्हा शिळ्या कढीला फोडणी दिली.
नेमकं आयतं कोलीत लोकांच्या हाती सापडलं आणि शेतक-यांचं नुसकान, त्यांना मिळणारी नुसकान भरपाई यापेक्षा बेडूक कोण? आणि गांडूळ कोण? हे ठरवण्यात पुन्हा महाराष्ट्राने स्वत:ला गुंतवून घेतलं. आता दिवाळी आली, “मोती साबणाने…” पण आता मोती साबण कुठेय? तो तर परतीच्या पावसात धुऊन गेला. त्यावर सरकार म्हटलं, “आम्ही देऊ, तोही दिवाळीच्या आधी..” लोकांच्या अशा पल्लवित झाल्या, चला आता हातात मोती येणार. आणि नेमकी माशी शिंकली, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका लागला आणि आचार संहिता लागू झाली. तरी सरकारने लोकांना दिलेलं आश्वासन दिलंय, त्याचं काय?
त्यातचं, अर्नब गोस्वामीला अटक झाली. दोन वर्षापूर्वी अन्वेय नाईक या व्यावसायिकाने आत्महत्या केली. त्या धसक्याने त्याची आईदेखील गेली. अन्वेय नाईकने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यात त्याने, अर्नब गोस्वामी, नितीन सरडा आणि फिरोज या तिघांनी माझे पैसे बुडवले त्यामुळे मला आर्थिकदृष्ट्या हानी झाल्याने मी आत्महत्या करत आहे. असं सरळ लिहून देखील अर्नब गोस्वामी याला अटक व्हायला दोन वर्ष लागली. मग आजपर्यंत प्रशासन आणि पोलीस काय झोपले होते का? कदाचित त्यावेळी भाजपाचं सरकार असल्याने त्यांनी त्याला पाठीशी घातलं. असं आजचं सरकार म्हणतंय.
परंतु त्यावेळच्या सरकारमध्ये आजच्या सरकारमधील प्रमुख पक्ष होताच की? मग त्यावेळी ते गप्प का राहिले? आणि आजच त्याना महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी मुलीचं कुंकू त्यांना दिसलं का? त्यावेळी का नाही दिसलं. अर्थात कोणत्याही स्वार्थाशिवाय काहीही करायचं नाही हे सगळ्याचं सरकारांचे उद्धिष्ट झाल्यासारखं दिसतंय. पुन्हा एकदा लोकांचं लक्ष मुख्य प्रश्नावरून विचलित होऊन, “अर्नबला वाचवा किंवा अर्नबला शिक्षा द्या” या दुहेरी मतांवर परावर्तीत झालं.
जेंव्हा सुशांतसिंग सारखा एक नट/सेलेब्रिटी नैराश्यात जाऊन आत्महत्या करतो. त्याच्या त्या हत्येला नेपोटीझम पासून ते हत्या यापर्यंत सगळे अंदाज लावले जातात. त्या दृष्टीकोनातून तपासही केला जातो, अनेक लोकांना दोषी ठरवण्याठी येतं, काहींना त्याचा मानसिक त्रास होतो तर रिया चक्रवर्ती सारख्या मुलीला त्यासाठी जेल मध्येही जावं लागतं. सीबीआय पासून ते महाराष्ट्राचे आणि बिहारचे पोलीस दिवसरात्र मेहनत करून हे ठरवण्याचा प्रयत्न करतात की, ती आत्महत्या होती की हत्या? पण निष्पन्न काहीच होत नाही कारण सुशांत सिंगने आत्महत्येपूर्वी अशी कोणतीही सुसाईड नोट लिहून ठेवलेलं नाही. परंतु अन्वेय नाईक प्रकरणी परिस्थिती पूर्ण वेगळी होती.
त्याने सुसाईड नोट मध्ये सरळ या तिघांची नावं लिहिली होती मग तो पर्याप्त पुरावा नव्हता का? का त्याने आत्महत्या केली हेच त्या नोटमुळे सिद्ध होत नव्हतं. म्हणजे सुशांतसिंग सेलेब्रिटी होता म्हणून त्याच्यासाठी तपासाची प्रक्रिया वेगळी आणि अन्वेय नाईक एक सामान्य नागरिक होता म्हणून त्याच्यासाठी न्यायिक प्रक्रिया वेगळी. मग या देशात लोकशाही आहे आणि कायदा सर्वांनाच सारखाच असतो हे फक्त संविधाना पुरतंच मर्यादित आहे का?
आज अर्नब गोस्वामी त्या पिडीत कुटुंबाला जर मोठ्या लोकांच्या नावाने धमकावत होता तर ती मोठी लोकं कोण? आणि आजच्या सरकारमधील एक पक्ष त्यावेळीही सरकारमध्ये होता मग तो त्यवेळी गप्प आणि आता आक्रमक का? नेमकं कुणाचं जळतंय आणि काय जळतंय? हे आता लोकांना माहित पडायलाच हवं. त्याचबरोबर लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या वेळेलाच ही असली प्रकरणी नक्की बाहेर कशी पडतात हेही माहित व्हायलाच हवं.
नाहीतर लोकांच्या जीवाला कळा लागल्या आहेत पण त्याचा उपाय मात्र कुठलाच सरकारकडे नाही असंच म्हणावं लागेल. साहेब जरा आम्हांलाही समजावून घ्या. तो अर्नब काय आणि सुशांतसिंग काय? ना त्यांना महाराष्ट्राचं सोयरे आणि सुतक. परंतु आम्ही तर महाराष्ट्राचेच आहोत ना. चला चला दिवाळी आली, मोती साबणाने? सरकारने साबण दिला तर अंघोळ नाहीतर कावळे अंघोळ.
लेखक – प्रा. भानुदास तान्हाजी पानमंद
COMMENTS