परळी – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन महिन्यांनंतर बीड जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी आजपासून जिल्ह्यांतर्गत एसटी बस सुविधा सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या एसटी च्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर मोफत वाटप करण्याचे कार्य जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हाती घेतले आहे.
धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत आज परळी आगारात सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लिटर सॅनिटायझर व मास्क मोफत वाटप करण्यात आले. यावेळी हे सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य आगारप्रमुख राजपूत व उपस्थित कर्मचारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. नाथ प्रतिष्ठान च्या वतीने रा. कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राजेंद्र सोनी, अनंत इंगळे, बालाजी वाघ यांनी हे वाटप केले.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार ते एसटी बसमधील सुरक्षा हे प्रश्न आधीच चर्चेत असताना कोरोनामुळे उदभवलेल्या भीषण परिस्थितीत कोरोना योद्धे म्हणून मैदानात उतरलेल्या बीड जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 3001 कर्मचारी आजपासून जिल्ह्यात सध्या सेवा देत आहेत.
जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 3001 कर्मचाऱ्यांना प्रति आगार 50 लिटर सॅनिटायझर आणि सर्व कर्मचाऱ्यांना मास्क देण्याचा मुंडे यांचा मानस असून त्यानुसार हे वाटप सुरू राहील, असे रा. कॉ. चे बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले.
COMMENTS