अंबाजोगाई – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात बीड जिल्ह्यातील एकमेव कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल उद्घाटन झाले. या उद्घाटनावर विरोधकांनी टीका केली आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांना पोटसुळ उठला की काय? असा सवाल जिल्ह्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळामध्ये जळगाव अर्थात खान्देशातून मंत्री महोदय गिरीश महाजन यांना निमंत्रित करून जिल्ह्यातील तसेच राज्यातील एकमेव असलेल्या वरिष्ठ सभागृहातील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव डावलून याच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात काही वाढीव खाटांचे लोकार्पण करणाऱ्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांना आज धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या कोरोना विषाणू प्रयोगशाळेच्या उद्घाटनाला न बोलवण्याचे शल्य वाटते, हे कोरोना पेक्षा वेदनादायक असल्याची भावना धनंजय मुंडे समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे सत्ता काळात गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या एमआरआय मशीनचा प्रश्नही त्यांना मार्गी लावता आला नव्हता अशी टीकाही केली जात आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या काळात कायमस्वरूपी अनुपस्थित असलेल्या जिल्ह्याच्या खासदार तथा शिक्षणाने डॉक्टर असलेल्या प्रीतम मुंडे, उच्चशिक्षित तथा नुकत्याच मातृत्व लाभलेल्या केज – अंबाजोगाई मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा कोरोनाच्या भीषण संकटात बीड जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून वैयक्तिक सुरक्षेसाठी आपापल्या मतदारसंघात गैरहजर होत्या, परंतु त्यांना याबाबतही ब्र शब्द कोणी विचारला नाही; हे राजकीय दबावाचे व पूर्व वर्चस्वाचे प्रतीक असल्याचे आता जिल्ह्यातील नागरिक बोलू लागले आहेत.
कोरोना काळात बीड जिल्ह्यात आयोजिलेल्या उपाययोजनामध्ये वेळोवेळी मुंडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सकारात्मक निर्णय घेतले असल्याचे सबंध जिल्हावासीयांनी पाहिले आहे. मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यातील स्वॅब तपासणी जिल्ह्यातच व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे, आरोग्य उपाययोजनासाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून देणारे पालकमंत्रीही सबंध जिल्ह्याने नव्हे तर महाराष्ट्राने पाहिले आहेत.
अशा कठीण काळात पालकमंत्री मुंडे यांनी आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान यांचा समन्वय घडवून आणत अत्यंत कमी कालावधीत जिल्ह्यात सकारात्मक बदल घडवून आणत असतील तर त्याचे कौतुक करायचे सोडून त्यामध्ये राजकारण शोधू पाहणाऱ्यांना जनतेने नैतिक पाठ शिकवले पाहिजेत; अशा चर्चा आता होताना दिसत आहेत.
तेव्हा कुठे गेला होता ‘तो’ राजधर्म? – कोनशिलेवरून वादविवाद
दरम्यान बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे तथा स्थानिक आमदार नमिता मुंदडा यांचे नाव अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयातील कोरोना विषाणू प्रयोगशाळा लोकार्पण कोनशिलेवर नसल्याचा फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर भाजपच्या सत्ताकाळातील माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या सत्ता काळात याच रुग्णालयातील काही खाटांचे लोकार्पण केलेला एक तत्कालीन फोटोही व्हायरल झाला असून, यामध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे उदघाटक म्हणून नाव असून जिल्ह्यातील नेते तथा तत्कालीन विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे नाव मात्र टाळल्याचे दिसून येत आहे.
भाजपच्या सत्ताकाळातील अशा राजकारणाला उत्तर नसताना आता या कठीण काळात मात्र ‘राजधर्म’ आठवतो? विरोधकांचा राजधर्म तेव्हा कुठे गेला होता असा सवाल यानिमित्ताने सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
COMMENTS