बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची भेट, शेतकय्रांना मोठा दिलासा !

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची भेट, शेतकय्रांना मोठा दिलासा !

भोकरदन/जालना – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या खरीप आढावा बैठकीमध्ये म्हटल्याप्रमाणे जिह्यातील कापूस खरेदी केंद्र वाढवणे, केन्द्रावरील कापूस खरेदी वाढवणे, यासह तूर व हरभरा खरेदी केंद्र सुरू करून त्यासाठी ग्रेडर नेमणे या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आज भोकरदन येथे जाऊन केंद्रीय ग्राहक व अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेतली.

सध्या राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे कापूस खरेदी केंद्रांना मर्यादा लावल्या असून, नोंदणी केलेल्या एका शेतकऱ्याचा ४० क्विंटल इतकाच कापूस विकत घेतला जात होता, ही मर्यादा वाढविण्यासंदर्भात मुंडेंनी केलेल्या विनंतीचा विचार करत रावसाहेब दानवे यांनी ७/१२ वर नोंद असलेल्या वाढीव कापसाला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रमाणित करून देण्याच्या अटीवर तो वाढीव कापूस खरेदी करण्यास आता अनुमती दिली आहे.

तसेच जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित तूर व हरभरा खरेदी तात्काळ सुरू करण्याचे आदेशही यावेळी दिले असून आता जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदीस प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत  मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व आ. संतोष दानवे हेही उपस्थित होते.

सद्यस्थितीत प्रतिदिन केवळ २० शेतकऱ्यांचा प्रत्येकी ४० क्विंटल कापूस खरेदी केला जात होता. पालकमंत्री मुंडे यांच्या सूचनेनुसार बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी २० वरून ही संख्या दिवसात दोन शिफ्ट मध्ये ५० वर नेली आहे. त्याचबरोबर ४० क्विंटल पेक्षा अधिक कापूस असलेल्या शेतकऱ्यांना ७/१२ वर असलेल्या नोंदी प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्रमाणित करून घ्यावे लागेल व मग अधिकचा कापूस खरेदी केला जाईल, असे श्री. दानवे म्हणाले.

दरम्यान जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढवणे, शेतकऱ्यांकडील कमी प्रतवारीचा संपूर्ण कापूस प्रतवारीनुसार भाव देऊन खरेदी करणे आदी मागण्यांबाबत रावसाहेब दानवे सीसीयायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात निर्णय देतील, तसेच एफसीआय मार्फत जिल्ह्यात सुरू झालेली तूर व हरभरा खरेदी विना व्यत्यय सुरू राहील; अशी माहिती  धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच राज्यातील संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगसह अन्य शासकीय नियमांचे पालन करावे असेही मुंडे म्हणाले.

COMMENTS