परळी – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात पहिल्या तीन महिन्यात बाळगला त्याप्रमाणे संयम बाळगावा व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना मीटर दोनशेच्या पार गेले असून, परळी येथील स्टेट बँकेच्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण परळी शहर लॉकडाऊन करण्यात आले.
दरम्यान शहर व तालुक्यातील जवळपास १५०० नागरिकांना तपासणी साठी अलग केले असून आतापर्यंत ९०० जणांचे स्वॅबतपासनी साठी घेतले आहेत. त्यातून दर दिवस काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत असून, आकडेवारी वाढताना दिसत आहे.
मुंडे यांनी या बाबीवर चिंता व्यक्त केली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, स्टेट बँकेतील कर्मचारी किंवा अन्य कोणत्याही कोरोना बाधिताच्या संपर्कात आले असल्यास स्वतःहून त्याची माहिती प्रशासनाला द्यावी, आवश्यकतेनुसार त्यांची तपासणी व स्वॅब टेस्ट केली जाईल, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांनी एका व्हीडिओ संदेशाद्वारे नागरिकांना आवाहन केले असून जिल्ह्यातील एकूण आकडेवारी जरी २०० पार गेली असली तरी त्यांच्यासहित कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ही १५० पेक्षा जास्त असल्याने कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण फार मोठे असून, जिल्ह्याला पुन्हा एकदा कोरोनामुक्त करणे हे आपल्या हातात आहे, परंतु पूर्वी लॉकडाऊन काळात बाळगला तसा संयम नागरिक आता बाळगताना आता नागरिक दिसत नसल्याचे म्हटले आहे.
नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, कोरोनासंबंधित कोणतेही लक्षणे आढळल्यास ती माहिती प्रशासनास तात्काळ कळवावी, कंटेन्मेंट झोन मध्ये प्रवेश करू नये, तसेच परळीसह जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे आवाहन केले आहे.
COMMENTS