मुंबई – मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आणि महाड येथील सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकाम यासाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन दिवसात याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याचे मुंडे म्हणाले. या बैठकीस विभागाचे मुख्य सचिव पराग जैन, सहसचिव दिनेश डिंगळे, समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे यांसह विभागाचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयास ग्रंथालय बांधकाम, ग्रंथालयातील सोयी सुविधा, वाणिज्य व विधी महाविद्यालयाची डागडुजी आदि कामे प्रलंबित होती व ती तातडीने करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती.
सामाजिक न्याय विभागाकडे प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी मुंबई स्थित पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या ग्रंथालय बांधकामासाठी ४ कोटी ९४ लाख ३६ हजार ७०० रुपये, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय व विधी महाविद्यालय या इमारतीच्या डागडुजी साठी १ कोटी ९९ लाख ७१ हजार ८७२ रुपये, तसेच सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ४ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाड जि. रायगड येथे सुभेदार संवादकर वसतिगृह बांधकामासाठी १ कोटी ३६ लाख ४० हजार ६०३ रुपये इतकी रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती.
धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आजच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असून, या चार कामांसाठी मिळून १२ कोटी ७९ लाख ७४ हजार १७५ रुपये इतक्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली भेट, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने केला पाठपुरावा
दरम्यान सिद्धार्थ महाविद्यालयातील गैरसोयीकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. तसेच यासंदर्भात आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आमदार भाई गिरकर यांनीही मुंडे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली होती. यावेळी त्यांच्या समवेत रमेश गायकवाड, चंद्रसेन कांबळे, प्राचार्य मस्के उपस्थित होते.
सिद्धार्थ महाविद्यालयात भेट देणार
दरम्यान पुढील आठवड्यात आपण सिद्धार्थ महाविद्यालयास भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची स्वतः पाहणी करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
COMMENTS