स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी पालकमंत्री धनंजय मुंडे

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी पालकमंत्री धनंजय मुंडे

मुंबई – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाची नव्याने स्थापना करण्यात आली असून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंडे यांच्या सह १० अशासकीय व ५ शासकीय अशा १५ सदस्यांचे हे अभ्यागत मंडळ रुग्णांना आणखी चांगल्या व वेळेवर उपचाराच्या सोयी मिळाव्यात यासह रुग्णालयातील अन्य सोयी सुविधांसाठी काम करणार आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्रालयाच्या वतीने अभ्यागत मंडळ पुनर्रचनेचा शासन निर्णय आज (दि. २९) रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या हा अभ्यागत मंडळामध्ये अंबेजोगाई येथील आ. संजय दौंड, सौ जयश्री पृथ्वीराज साठे, सौ. समीना खालेद चाउस, परळी येथील डॉ. मधुसूदन काळे, अंबेजोगाई येथील श्री. विलास सोनवणे, डॉ. हनुमंत चाफेकर, श्री. रणजित लोमटे, श्री. कचरू सारडा, तसेच पत्रकार गजानन मुडेगावकर हे दहा अशासकीय सदस्य असतील.

तसेच या अभ्यागत मंडळामध्ये शासकीय सदस्य म्हणून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय आरोग्य उपसंचालक, अंबेजोगाई नगर पालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष, एक कर्मचारी प्रतिनिधी आणि अभ्यागत मंडळाचे विभाग प्रमुख असे पाचजण शासकीय पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहतील.

रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या शासकीय व इतर निधीचा योग्य विनियोग होऊन त्याचा पुरेपूर वापर सुविधांसाठी आवश्यकतेनुसार व्हावा याचे व्यवस्थापन करण्यासाठी, जनतेच्या तक्रारी सोडवून त्यांना योग्य उपचार वेळेत मिळवून देण्यासाठी, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती, वर्तन आदींचे नियमन करणे, रुग्णालय परिसर तपासणी, कामकाजाचा आढावा, रुग्णालयास प्राप्त होणाऱ्या देणग्या व त्याचा योग्य विनियोग, यांसह आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी करून रुग्णालयात सुसज्जता व सुसूत्रता आणणे हे या अभ्यागत मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट असते.

रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाउन होणारा खर्च टाळता यावा हेच उद्दिष्ट – धनंजय मुंडे

दरम्यान कोविड १९ चा जिल्ह्यात प्रसार सुरू झाल्यापासून अतिशय सतर्क आणि दक्ष राहून बीड जिल्ह्यातील आरोग्यसुविधांसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून देऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या काही दिवसात दक्ष पालकाची भूमिका बजावली आहे.

स्वाराती महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय हे मोठी क्षमता असलेले रुग्णालय असून, येथील एमआरआय मशीनचा प्रश्न नुकताच मार्गी लागला आहे. येणाऱ्या काळात इथे परिपूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून गंभीर आजारांवरील रुग्णांना मोठ्या शहरात लाखो खर्चून उपचार घ्यावे लागतात, हे थांबवणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे.

COMMENTS