दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्यासाठी केंद्राकडे 7 हजार कोटींचा प्रस्ताव – मुख्यमंत्री

दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्यासाठी केंद्राकडे 7 हजार कोटींचा प्रस्ताव – मुख्यमंत्री

उस्मानाबाद – राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्याकरीता ७ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच लवकरच केंद्राचे पथक राज्याच्या दौर्‍यावर येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्याकरिता आपण युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहोत. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्याकरीता तसेच पाणीटंचाई, चार्‍याचा प्रश्न यांसह विविध अनुदान याकरीता केंद्राकडे आपण ७ हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुष्काळ आणि कायदा सुव्यवस्था आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

दरम्यान कृष्णा, मराठवाडा प्रकल्पाकरिता राज्य सरकारने नाबार्डकडे २ हजार २०० कोटी रूपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पास पर्यावरण मान्यताही मिळाली आहे. आजवर या प्रकल्पाकरिता ८०० कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. चार वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्याकरिता सर्वतोपरी परिश्रम घेण्यात आले आहेत. निश्चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता राज्य सरकारच्यावतीने नाबार्डकडे २२०० कोटी रूपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

 

COMMENTS