खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा इतका विरोध का?

खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा इतका विरोध का?

मुंबई : पुणे येथील भोसरी येथील भूखंड खरेदी व्यवहाराची राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी खडसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर गुरूवारच्या सुनावणीत न्यायालयाने ईडीच्या एकंदरीत भूमिकेवर काहीशी नाराजी व्यक्त केली. खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा इतका विरोध का?, असा सवाल करत समन्सचा मान ठेवत ते चौकशीला हजर झाले, तर मग दिलासा दिला तर दोन-तीन दिवसांनी काय मोठं आभाळ कोसळणार आहे? असा सवाल हायकोर्टानं ईडीला विचारला.

भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात ईडीनं केवळ राजकीय दबावातून चौकशी सुरू केली आहे, असा थेट आरोप खडसेंनी या याचिकेतून केला आहे. त्यामुळे ईडीनं दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणी एकनाथ खडसेंनी हायकोर्टात केली आहे. तसेच भविष्यात ईडीकडनं होणाऱ्या चौकशीचं व्हिडिओ शूटींग करण्यात यावं अशी मागणीही त्यांनी या याचिकेत केली आहे. ईडीच्यावतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी यासंदर्भात आपलं प्रतिज्ञापत्र सादर करत खडसेंच्या याचिकेला जोरदार विरोध केला आहे. खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीनं गुरूवारी जोरदार विरोध केला. अशापद्धतीनं चौकशी सुरू असताना अटकेपासून दिलासा देणं योग्य ठरणार नाही, असं स्पष्ट करत येत्या सोमवारपर्यंत होणाऱ्या सुनावणीपर्यंत आम्ही खडसेंविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, अशी ग्वाही ईडीच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली.
.

COMMENTS