नागपूर – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकावर हल्लाबोल केला आहे. कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयकावर बोलताना खडसेंनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. सरकारचे धोरण सहकारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांविरोधात असल्याची जोरदार टीका खडसे यांनी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एकही पैसा उत्पन्न नाही. बाजार समित्या खाजगी मार्केट कमिटीच्या ताब्यात दिल्या तर ते शेतक-यांना नागवतील. तसेच सहकारी बाजार समित्यांवर निकष, अटीद्वारे नियंत्रण आणून खाजगी मार्केट कमिट्या माजतील त्यामुळे खाजगी मार्केट कमिट्या बंद करण्याची मागणी एकनाथ खडसे यांनी आज सभागृहात केली आहे.
दरम्यान सहकारी बाजार समित्यांवर नियंत्रण आणण्यासाठी निवडणूक लावता पण त्याचा लाखो रुपये खर्च कोण करणार असा सवालही खडसे यांनी केला आहे. तसेच लोकशाही डोक्यात गेली असेल तर सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीचा लाखो रुपयांचा खर्च करावा. एकतर उत्पन्न नाही आणि सरकार बंधन आणत असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. तसेच जिल्हा बँकांना सांगता कर्जावरील व्याज तुम्ही भरा, कर्जमाफी तुम्ही करायची आणि व्याज जिल्हा बँकांनी भरायचे हे कुठलं सरकारचं धोरण आहे असंही खडसेंनी यावेळी म्हटलं आहे. तसेच शेतकर्यांच्या संस्था जिवंत राहिल्या तर शेतकरी जगेल अन्यथा शेतकर्यांची लूट होईल असंही यावेळी खडसेंनी म्हटलं आहे.
COMMENTS