जळगाव – मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे नाव बदलून, एकनाथ खडसे पोलीस ठाणे असं करण्याची मागणी करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथील गणपतराव खडसे अनुदानित आश्रम शाळेतील गैरव्यवहार प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस राजकीय दबावामुळे कोणतीही दखल घेत नाहीत. त्यामुळे या पोलीस ठाण्याचे नाव बदलण्याची मागणी या शाळेतील माजी कर्मचारी नरेंद्र तायडे यांनी केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा वादाच्या भोवय्रात सापडणार असल्याचं दिसत आहे.
दरम्यान तायडे हे या शाळेत अधिक्षक पदावर कार्यरत होते. त्यावेळी गणपतराव खडसे अनुदानित आश्रम शाळेतील संशयित आरोपी व मुख्याध्यापक राजेश पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय अनुदानात एक लाख ७५ हजार ३६४ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते अशी माहिती तायडे यांनी दिली आहे. तसेच याबाबत त्यांनी आदिवासी विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली होती. मात्र खडसेंच्या दबावामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, असा आरोपही तायडे यांनी केला आहे.
तसेच याप्रकरणी राजकीय दबावामुळे गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल न झाल्याने २ डिसेंबर २०१५ रोजी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांनीही या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकास अफरातफर केल्याप्रकरणी दोषी ठरविले आहे. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामुळे मुक्ताईनगर पोलिसांनी अद्यापही या आरोपीस अटक केलेली नाही. या प्रकरणात दोषारोपपत्र देखील दाखल केलेले नसल्याचं तायडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS