मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. विभागप्रमुखांमध्ये बदल केल्यानंतर आता संपर्क नेतेही बदलले जात आहेत. कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंकडे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी कोकणातल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती. परंतु देसाईंऐवजी आता ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सुभाष देसाईंकडे आता फक्त रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान यापुढेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून अनेक महत्त्वाचे बदल केले जाणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच शिवसेना नेतृत्वाकडून मुंबईतल्या विभागप्रमुखांमध्येही मोठे बदल करण्यात आले असून सुभाष देसाई, रामदास कदम आणि सुनिल प्रभू यांच्या तक्रारींनंतर कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना विभागप्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे. अडसूळ विभाग दोनचे विभागप्रमुख होते. यामध्ये कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम हा परिसर येतो. अडसूळ यांना हटवून त्यांच्या जागी सुधाकर सुर्वे यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या या बदलामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल केले जात असल्याचं दिसत आहे.
COMMENTS