कोल्हापूर – जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश केला
मुश्रीफ म्हणाले की, राजीव आवळे हे जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत. पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपने धमक्या देऊन त्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला. आवळे यांच्यापासून सुरुवात होत आहे. यापुढे अनेकजण भाजपमधून राष्ट्रवादीत येतील.
कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट होत असताना राजीव आवळे यांच्यासारखा अनुभवी, लोकांना हवाहवासा वाटणारा नेता पक्षात येत असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आवळे यांचे पक्षात स्वागत केले.
पक्षातील मातंग आणि बहुजन समाजाला आवळे यांच्या पक्षप्रवेशाने एक उत्त्म नेतृत्व मिळाले असल्याची भावना यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली. राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगर परिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता आवळे, वडगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष लता सूर्यवंशी, महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे डॉ. प्रफुल्ल असुरलेकर, डॅरल डिसुझा, मॅलेट परेरा, अनिल भोसले, भारतीय लहुजी पँथरचे प्रदेश संघटक युवराज दाखले यांचादेखील प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते.
COMMENTS