माजी खासदाराच्या घरात 2.5 लाखांची चोरी !

माजी खासदाराच्या घरात 2.5 लाखांची चोरी !

अहमदनगर – माजी खासदाराच्या घरातून चोरट्यांनी 2.5 लाखांची रक्कम लंपास केली असल्याची घटना समोर आली आहे.  यशवंतराव गडाख यांच्या घरात ही चोरी झाली असून नगर-औरंगाबाद महामार्गावरील यशवंत कॉलनीमधील विरंगुळा बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून या चोरट्यांनी 2.5 लाख रुपये लंपास केले आहेत. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान या चोरट्यांनी गडाख यांची पैशांची बॅग लंपास केली होती. त्यामध्ये काही कागदपत्र देखील होती. परंतु बॅगमधील कागदपत्रे आणि साहित्या बंगल्याजवळ सापडले असून त्यातील रक्कम मात्र या चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी विजय यशवंतराव गडाख यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात तोफखाना पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेदरम्यान ही चोरी झाली असल्याची माहिती आहे. या बॅगमध्ये अडीच लाख रुपयांची रक्कम होती. दोन हजार रुपयांच्या शंभर नोटा, पाचशे रुपयांच्या १०० नोटा होत्या. पैशांबरोबरच गडाख यांचे कपडे, दोन पुस्तके, माजी आमदार, माजी खासदारचे ओळखपत्र व पत्नी शारदा गडाख यांचे आधारकार्ड होते. ही बॅग चोरट्यांनी चोरून नेली. सकाळी साडेसहाच्या सुमारास चोरी झाल्याचे घरातील सदस्यांच्या निर्दशनात आले. गडाख यांच्या बंगल्याचा सुरक्षारक्षक काही दिवस सुट्टीवर गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संजयकुमार सोने हे करत आहेत. त्यामुळे गडाख यांच्या घरात नेमकं चोरी कोणी केली हे तपासानंतरच उघड होणार आहे.

COMMENTS