मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदान आज पार पडलं. येत्या 23 तारखेला लोकसभेचा निवकाल जाहीर होणार आहेत. परंतु तत्पूर्वी विविध न्यूज चॅनल्सनी एक्झीट पोल मांडले आहेत. आम्ही घेतलेल्या आढाव्यानुसार माढा लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच विजय होणार असल्याचा अंदाज आहे. माढ्यात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांच्यामध्ये लढत झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात चुरशीची लढत झाली आहे. परंतु स्थानिक पत्रकार, स्थानिक राजकीय अभ्यासक, पडद्यामागच्या घडामोडी, मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण यावरुन राष्ट्रवादीचाच याठिकाणी विजय होईल असा अंदाज आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली तोच हा माढा मतदारसंघ आहे. शरद पवारांनी 2009 मध्ये माढातून निवडणूक लढवली तर 2014 मध्ये विजयसिंह मोहिते पाटील हे माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांना 4 लाख 89 हजार 989 मतं मिळाली तर भाजपचे मित्रपक्ष म्हणून लढलेले सदाभाऊ खोत यांना 4 लाख 64 हजार 645 मतं मिळाली होती. यावेळी शरद पवार माढामधून लढणार, अशी चर्चा होती पण शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माढामधून राष्ट्रवादीतर्फे संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली तर भाजपतर्फे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रिंगणात उतरले होते.
या मतदारसंघात निवडणुकीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आधी काँग्रेसमध्ये असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमधल्या प्रवेशानंतर लगेचच त्यांना माढामधून उमेदवारी देण्यात आली. तर उमेदवारी न मिळाल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांनी थेट भाजपला पाठिंबा दिला. याचा फटका राष्ट्रवादीला बसेल असं बोललं जात होतं. परंतु एक्झीट पोलच्या अंदाजानुसार याठिकाणी पुन्हा राष्ट्रवादीचाच विजय होणार असल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्र
एकूण जागा 48
भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी इतर
विदर्भ 3 2 3 2 0
मराठवाडा 3 1 2 2 0
प.महाराष्ट्र 1 2 1 4 2
उ. महाराष्ट्र 3 2 1 2 0
मुंबई-कोकण 3 5 2 1 1
COMMENTS