अहमदनगर – भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचं दिसत आहे. कारण दिलीप गांधी आणि त्यांचा नगरसेवक मुलगा सुवेंद्र गांधी यांच्यासह चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भूषण गोवर्धन बिहाणी यांनी ही फिर्याद दाखल केली आहे. खंडणी आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी फोर्ड शोरुमचे मालक भूषण बिहाणी यांनी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सीआयडी चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती आहे.
दरम्यान 2014 साली खासदार गांधी यांनी बिहाणी यांच्या फोर्ड शोरुममधून इन्डेवर कार खरेदी केली होती. मात्र यानंतर गांधी यांनी गाडीबाबत तक्रार केली. या प्रकरणी जून 2015 साली सुवेंद्र गांधींनी सहकाऱ्यांच्या मदतीने शोरुमधील मॅनेजरचं अपहरण केलं. त्याचबरोबर मारहाण करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली. तर खासदार दिलीप गांधी यांनी खासदारपदाचा वापर करुन माझ्याबाबत मंत्री आणि आयकर विभागाकडे तक्रार केली असल्याचा आरोप बिहाणी यांनी केला आहे. तसेच नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलीस अधीक्षकांकडे त्यांनी तक्रार केली होती.
COMMENTS