मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी रात्री वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या वादाबाबत ही चर्चा होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि कोकणातील इतर लोकप्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटले. मात्र ही भेट होण्याच्या आधी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात 15 मिनिटे बंददार चर्चा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत चर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिवसेनेने काही दिवसांपूर्वी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्बवळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याविरोधात तयार होत असलेलं राजकीय वातावरण यामुळे भाजपला आता शिवसेनेची गरज भासू लागली आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करुनच निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी भाजप हायकमांडने शिवसेनेला 140 फॉर्म्युला दिल्याचीही बातमी माध्यमांमध्ये आली होती. त्यापार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचा काही निरोप मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे आता शिवसेना पुन्हा युती करणार की स्वबळाचा नारा कायम ठेवणार याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.
या बंददार चर्चेत आणखी एका विषयावर चर्चा झाली असण्याची शक्याता आहे. पालघर आणि भंडारा गोंदिया या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. सध्याचं वातावरण बघता दोन्ही जागा भाजपसाठी सोप्या नाहीत. त्यातच शिवसेनेनं वेगळे उमेदवार दिले तर भाजपची कोंडी होणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली असण्याची शक्यता आहे. भेटीनंतर नाणार प्रकल्पाबाबत चर्चेचा तपशील उद्धव ठाकरे यांनी दिला मात्र बंददार चर्चेबाबत बोलण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिला. त्यामुळेच युतीबाबतच्या चर्चेची शक्यता बळावली आहे.
COMMENTS