नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर देशातील मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तब्बल 22 गुन्हे दाखल असून त्यापैकी तीन गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. देशातील 29 राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार एडीआर हा अहवाल प्रसिध्द केला असून यामधे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याविरोधात 11 गुन्हे दाखल आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असून त्यांच्यावर तीन खटले दाखल झाले असल्याची माहिती आहे.
एडीआर या संस्थेनं दिलेल्या या अहवालात देशभरातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचीही माहिती देण्यात आली असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत. तर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार हे सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. चंद्राबाबू नायडू यांची 177 कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे असून त्यांच्याकडे 129 कोटी, तर तिसऱ्या क्रमांकावरील पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे 48 कोटींची संपत्ती आहे. तर सर्वात गरीब सीएम माणिक सरकार यांची एकूण संपत्ती अवघी 26 लाखांची आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असून त्यांच्याकडे 30 लाखांची संपत्ती असल्याची माहिती या संस्थेनं दिली आहे.
COMMENTS