शेतकऱ्यांची आज राजभवनावर धडक

शेतकऱ्यांची आज राजभवनावर धडक

मुंबई: केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला असून मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांतून हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात एकवटू लागले आहेत. दरम्यान, आज हे शेतकरी राजभवनावर धडक मारणार आहेत

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत. कंत्राटी कामगार प्रथा तसेच शेतकरी कामगार विरोधी कायदे रद्द करणे, ही देखील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, कामगार मुंबईतील आझाद मैदान येथे जमले आहेत. नाशिक येथून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे १५ हजार शेतकरी मार्गस्थ झाले होते. हे शेतकरी रात्री उशिरा आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज राजभवनावर धडक देणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नाही. सकाळी मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. दरम्यान, पोलिसांनी मोर्चा दक्षिण मुंबईत नेहण्यास परवानगी नाकारली आहे.

आझाद मैदानात शेतकऱ्यांचे हे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असणार आहे. या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचाही पाठिंबा असून आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. या आंदोलनात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

COMMENTS