“तुम्ही आत्महत्या करा मग आम्ही मदत करू !”

“तुम्ही आत्महत्या करा मग आम्ही मदत करू !”

मुंबई – खासदार राजू शेट्टी आणि विधानसभेचे विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आत्महत्येचा प्रयत्न करणा-या धर्मा पाटील या शेतक-याची भेट घेतली आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन त्यांनी धर्मा पाटील यांची भेट घेतली असून त्यावेळी या दोघांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही आत्महत्या करा मग आम्ही शेतक-यांना मदत करू असं राज्य सरकारचं धोरण असल्याची टीका विखे-पाटील यांनी केली आहे.

दरम्यान सरकारी अनास्था, भ्रष्टाचार, दलाली याचे हे उत्तम उदाहरण असून दलालीमार्फत नुकसानभरपाई मागणारा शेतकरी कोट्यधीश होतो,  इतर शेतक-यांची मात्र फरफट होत असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता. तसंच संबंधित दोषी अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यावेळी शेट्टी यांनी केली आहे.

तसेच ही घटना वेदनादायक असून दलालांमार्फत गेलेल्यांचे उखळ पांढरे होत आहे. हे महसूल खात्याचे अपयश असून मंत्र्यांचा अंकुश नसल्याने अधिकारी बेलगाम झाले असल्याचं विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच संबंधित अधिका-यांवर कारवाई झाली पाहिजे. तेथील मंत्र्यांना खातेफोड करून मिळते परंतु शेतक-यांना मिळत नसल्याचंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच सरकार आता सानुग्रह अनुदान देत असले तरी मी ते स्विकारणार नाही. शेजारच्या बागायतप्रमाणे मलाही मोबदला मिळायला हवा.  न्याय मिळत नसल्याने माझ्या वडिलांनी मुंबईत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे जर आता सरकारने न्याय न दिल्यास मला दिल्लीत जावून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असं वक्तव्य त्यावेळी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी केलं आहे.

COMMENTS