नक्षलवादी करणार होते ‘त्या’ आमदारांवर हल्ला, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली !

नक्षलवादी करणार होते ‘त्या’ आमदारांवर हल्ला, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली !

गडचिरोली नक्षलवाद्यांच्या रडारवर अनुसूचित जमाती कल्याण समितीतील आमदार होते अशी खळबळजनक माहिती शहापूरचे आमदार आणि समितीचे सदस्य पांडुरंग बरोरा यांनी दिली आहे. तसेच याबाबतची माहिती मिळताच या नक्षलवाद्यांचा खात्मा पोलिसांनी केला असून गेल्या 38 वर्षातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागात सी-60 या नक्षलवादी विरोधी पथकाने 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. आमदारांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

दरम्यान ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभेचे आमदार पांडुरंग बरोरा, नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभेचे आमदार वैभव पिचड, पालघर येथील विधानपरिषद आमदार आनंद ठाकूर, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे आणि पालघर जिल्ह्यात डहाणू विधानसभेचे आमदार अमित घोडा हे  भामरागड नक्षली भागाच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु या परिसरात वाहनाने जाण्यासाठी आमदारांच्या समिती सदस्यांना पोलीसांनी मनाई केली होती. या ठिकाणी जाण्यासाठी खास हेलिकॉप्टर मागावून अहेरी ते भामरागड प्रवास केला. मात्र, या समिती दौऱ्याला लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी नजर ठेवून होते. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

COMMENTS