नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं तयारी सुरु केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे देशभरातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाणार नसल्याचं दिसून येत आहे. मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान या पाच राज्यांमधील निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तेलंगणामध्ये विधानसभा बरखास्त झाल्यानंतर याठिकाणी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. तसेच छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची शक्यता असून उर्वरित राज्यांत एकाच टप्प्यात निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा विचार असल्याची माहिती आहे.
मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ १५ डिसेंबरमध्ये संपणार आहे. तर छत्तीसगडचा कार्यकाळ ५ जानेवारी २०१९, मध्य प्रदेश ७ जानेवारी आणि राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ २० जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निवडणुका एकावेळी डिसेंबरमध्ये घेण्याबाबत निवडणूक आयोगानं तयारी सुरु केली आहे.
COMMENTS