मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचवेळी अजित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत असून त्यावर भाष्य करताना ‘गाव कारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या’, असा खास संदेश देत दमही दिला आहे.
अजित पवार यांनी दुपारी माध्यमांशी बोलतानाही निकालांवर भाष्य केलं होतं. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहता राज्यात महाविकास आघाडीचीच चलती असल्याचे ते म्हणाले होते. महाविकास आघाडी मधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अपेक्षित यश मिळवले आहे. जिथे ज्या पक्षाची ताकद आहे तो पक्ष जिंकला आहे. या विजयाचं सारं श्रेय कार्यकर्त्यांना द्यायला हवं. ही निवडणूक काही पक्षाच्या चिन्हावर लढली जात नाही. म्हणून या विजयाला अधिक महत्त्व आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्त्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी आता तुम्हाला मिळाली आहे. गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावं. जनतेचा विश्वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना दिलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे.
COMMENTS