गणपतराव देशमुखांचा वारसदार अखेर ठरला, सांगोल्यातून लढवणार विधानसभा !

गणपतराव देशमुखांचा वारसदार अखेर ठरला, सांगोल्यातून लढवणार विधानसभा !

सांगोला – शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली होती. त्याचं वय आता 92 वर्षांचं आहे. देशमुख यांच्या घोषणेनंतर सांगोल्यातून शेकापकडून विधानसभा कोण लढवणार याबाबत तर्तवितर्क लावले जात होते. कधी गणपातरावच पुन्हा लढतील असं सांगितलं जायचं तर कधी गोपीचंद पडाळकर निवडणूक लढवतील असं सांगितलं जायचं.

सांगोल्यातील उमेदवार ठरवण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्षाची बैठक झाली. पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील या बैठकीला उपस्थित होते. त्यामध्ये भाऊसाहेब रुपनर यांची एकमाने निवड करण्यात आली. रुपनर हे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्ष ते गणपतराव देशमुख यांचे कटट्टर कार्यकर्ते म्हणून काम करत आहे. मतदारसंघात त्यांची सूत गिरणी आहे. तसंच त्यांचा एक साखर कारखानाही आहे. पूर्वी सरकारी नोकरीत असलेले रुपनर हे नोकरीचा राजीनामा देऊन व्यवसायात उतरले. आणि हळूहळू शेकापच्या कामात गुंतले.

2014 मध्येही भाऊसाहेब रुपनर यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख यांनी त्याला विरोध केला होता. तसंच त्यांनी बंडखोरी करण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे त्यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा गणपतराव देशमुख यांना निवडणूक लढवण्यास गळ घातली होती. त्यामुळे गेल्यावेळी गणपतराव देशमुख यांना नाईलाजाने लढावे लागले होते. त्यात ते जिंकूनही आले होते. यावेळी मात्र रुपनर यांनी उमेदवारी सर्वमताने झाली आहे. त्यामुळे रुपनर यांच्याविरोधात आता कोण रिंगणात उतरतं याकडं संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS