कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला, जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन !

कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला, जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन !

नवी दिल्ली – देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि कामगार नेते


जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मुंबईच्या जनजीवनाशी जोडले गेलेले एकेकाळचे बंदसम्राट अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे कामगारांसाठी लढणारा योद्धा हरपला असल्याचं बोललं जात आहे.

जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० रोजी मंगळुरु येथे झाला. मुंबईत आल्यावर ते कामगार चळवळीत सक्रीय झाले.  जॉर्ज फर्नाडिस १९७३ मध्ये ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली ८ मे १९७४ रोजी मुंबईत रेल्वे कामगारांचा संप झाला.

Political leader George Fernandes. Express archive photo *** Local Caption *** Political leader George Fernandes.

राजकारणात फर्नांडिस पर्वाची सुरुवात

आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत ते विक्रमी मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीमुळे राजकारणात फर्नांडिस पर्वाची सुरुवात झाली. केंद्रीय दळणवळण मंत्री, रेल्वे आणि संरक्षण अशा विविध मंत्रालयाची धूरा त्यांनी सांभाळली आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात ऑक्टोबर २००१ ते मे २००४ या कालावधीत ते संरक्षणमंत्री होते. ऑगस्ट २००९ ते जुलै २०१० या काळात ते राज्यसभेत खासदार होते. १९६७ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आमदार कपिल पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाने देशातील समाजवादी आणि कामगार चळवळीचा एक अध्याय संपला आहे. कोकण रेल्वेचे ते शिल्पकार होते. कोकणातील जनता जॉर्ज साहेबांना कधीच विसरणार नाही. जॉर्ज साहेब म्हणजे कामगारांशी घट्ट नातं. मुंबई बंद किंवा भारत बंद फक्त जॉर्ज साहेबच करू शकत होते. गरिबांबद्दल, कष्टकऱ्यांबद्दल तळमळ आणि त्याचबरोबर सत्तेवर राहूनही निहायत साधेपणा हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते निष्कांचन जगले. मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठीत करण्याचं श्रेय ही जॉर्ज फर्नांडिस यांनाच जातं. त्यांच्या एका हाकेने मुंबईचं चाक बंद व्हायचं आणि सुरू व्हायचं. इतकी मोठी ताकद अन्य कोणत्याही कामगार नेत्यामध्ये नाही. जॉर्ज फर्नांडिस यांना विनम्र श्रद्धांजली!

COMMENTS