मुंबई – निसर्ग चक्रीवादळ मदत कार्य करताना रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पंचनामे व मदत वाटप करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी केला. घोसाळकर यांनी काल रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची शिष्टमंडळासह भेट घेत मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मदतकार्यात त्रुटी असल्याचे सांगितले.
असे पंचनामे शिवसेना कदापिही सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्व पंचनामे निःपक्षपाती पणे करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी देखील चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आलेले पंचनामे व मदतनिधी परत घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.गेल्या पंधरा दिवसात रायगड जिल्ह्याच्या आपण दोनदा दौरा करून परिस्थितीचा घेतला आहे. जिल्ह्यातील मदत निधी वाटप संथ गतीने होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनातील काही अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप घोसाळकर यांनी यावेळी केला.
शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र आदींची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांचे घर पडायला आले असताना त्याने मदतनिधी लाटल्याचा आरोप जिल्हाप्रमुख अनिल नवघणे यांनी केला. याबाबत तक्रार करताच मदत निधी थांबविण्यात आल्याची माहिती नवगणे यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, तळा तालुका प्रमुख प्रभूंन्न ठसाळ, म्हसळा तालुकाप्रमुख महादेव पाटील, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, श्रीवर्धन तालुका प्रमुख अनिल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
COMMENTS