भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, मुंडे समर्थकांची घोषणाबाजी !

भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, मुंडे समर्थकांची घोषणाबाजी !

मुंबई – भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. परंतु या कार्यक्रमादरम्यान भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक भाजपवर नाराज झाले आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या एकाही बॅनरवर फोटो नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी नाराज मुंडे समर्थकांना पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे.

राज्यात भाजप पक्ष आहे, तो गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आहे, मात्र इथे आल्यानंतर त्यांचा फोटोच बॅनरवर नसल्याचं दिसलं. भाजपने बॅनरवर त्यांचा फोटो लावावा  अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाजपचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी भाजपने 28 विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती. या ट्रेन पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी आणि वांद्रे या स्थानकात थांबणार होत्या. मात्र विशेष ट्रेन असल्याने त्यांना विलंब झाला.

COMMENTS