सांगली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जोरदार आंदोलन राज्यभरात सुरु आहे. या आंदोलनात राज्यातील अनेक शेतक-यांनी सहभाग घेतला असल्याचं पहावयास मिळतं आहे. आंदोलक शेतक-यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर दूध ओतून दिलं आहे. दरम्यान दुधाच्या दराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याबाबत अनुकूल आहेत. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपली भूमिका सोडायला तयार नसल्याचं वक्तव्य जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. दूध दराबाबतचं आंदोलन हिंसक होऊ नये याबाबतची काळजी नेत्यांनी घ्यावी. तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ देऊ नये. तसं केलं तर कारवाई अटळ असल्याचा इशारा यावेळी गिरीश महाजन यांनी दिला आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी दूध आंदोलन शांततेच्या मार्गानं करावं. दुधाची नासाडी करु नये, असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलकांना केलं आहे. परंतु दूधाला भाव दिला नाही तर, आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांची पूजा होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. दूधाला लीटरमागे पाच रुपये दरवाढ मिळावी अन्यथा आंदोलोन सुरुच रहाणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. मिरज पूर्व भागातील १०० दूध डेयरी मालक, दूध संकलन केंद्राचे मालक, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन चांगलच चिघळत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS