पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राच्या राज्यपालांचा पहिला नंबर!

पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राच्या राज्यपालांचा पहिला नंबर!

मुंबई – महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने आयोजित केलेल्या “ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतस‍िंह कोश्यारी यांना आंतरदेशीय पत्र प्रवर्गात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक पी सी जगताप व सहाय्यक अधिक्षक एस डी खरात यांनी आज (15 जून) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन त्यांना प्रथम पुरस्काराचा २५००० रुपये रकमेचा धनादेश सुपूर्द केला.

“प्रिय बापू आप अमर है” या विषयावरील या पत्रलेखन स्पर्धेत लिफाफा व “आंतरदेशीय पत्र” या दोन प्रवर्गात स्पर्धा झाली. स्पर्धेत ८०,००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतल्याची माहिती डाकसेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दिनांक ६ नोव्हेंबर २०१९ रोजी भारतीय डाक व‍िभागाच्या वतीने मुंबईपेक्स या दूर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे उदघाटन राज्यपाल भगतस‍िंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले होते, त्यावेळी पत्र लेखन स्पर्धा आयोजित केल्या बददल डाक विभागाचे कौतूक करताना या स्पर्धेत आपण स्वत: सहभागी होऊ असे राज्यपालांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आंतरदेशीय पत्रावर महात्मा गांधी यांच्या जीवनावर निबंध लेखन करुन स्पर्धेत पाठविला होता.

COMMENTS