विधानपरिषदेच्या चार जागांसाठी पार पडलं मतदान, या उमेदवारांमध्ये मुख्य लढत !

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी पार पडलं मतदान, या उमेदवारांमध्ये मुख्य लढत !

मुंबई  विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात मतदान घेण्यात आलं आहे. या निवडणुकीकडे सध्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून या निवडणुकीचा निकाल 28 जूनला लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे लक्ष लागलं आहे.

कोकण पदवीधर निवडणूक

या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वात चुरशीची निवडणूक म्हणून पाहिलं जात आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली आहे. त्यामुळे गद्दाराला धडा शिकवा या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली असून स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत सभा घेतली होती. शिवसेनाही या निवडणुकीत तयारीनिशी उतरली असल्याचं पहावयास मिळत आहे.

नजीब मुल्ला –राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

आज पार पडत असलेल्या मतदानादरम्यान राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली असून गद्दारला धडा शिकवणार, मतदार नोंदणी करायला मला वेळ मिळाला नाही, पण आमचा विजय होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

निरंजन डावखरे -भाजप

दरम्यान भाजपमध्ये माझ्याविरोधात नाराजी असल्याचं प्रचारादरम्यान कुठेही जाणवलं नसून मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला आहे.

कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार
भाजप – निरंजन डावखरे
राष्ट्रवादी काँग्रेस – नजीब मुल्ला
शिवसेना – संजय मोरे

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक

या मतदारसंघातही चुरशीची निवडणूक पहायला मिळत असून आज सुरु असलेल्या मतदानादरम्यान बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर शिवसेना उमेदवार दराडे समर्थक आणि संदीप बेडसे समर्थकांमध्ये हाणामारी झाली असल्याची माहिती आहे. शिवसेनेने माघार घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपातून ही हाणामारी झाल्याची माहिती आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक

कोकणसोबतच मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही आज पार पडत असून यावर्षी शिवसेना, भाजप आणि इतर पक्षाने ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर सर्वच मंत्र्यांनी या निवडणुकीसाठी मेहनत घेतली आहे.

 पक्ष आणि उमेदवार
भाजप – अॅड. अमितकुमार मेहता
शिवसेना – विलास पोतनीस
लोकभारती – जालिंदर सरोदे
अपक्ष ( मनसे स्वाभिमानी पुरस्कृत) – राजू बंडगर
अपक्ष – डॉ. दीपक पवार

मुंबई शिक्षक मतदारसंघ

या मतदरासंघातही चुरशीची निवडणूक आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखून ठेवला असून यावर्षी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपनं ताकद लावली आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी पाकिटं वाटल्याचा तसेच बंगल्यावर बोलवून शाळा संस्थाचालकांची बैठक घेतल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.

 पक्ष आणि उमेदवार
शिवसेना – शिवाजी शेंडगे
लोकभारती – कपिल पाटील
अपक्ष (भाजप पुरस्कृत) – अनिल देशमुख

 

COMMENTS