विधानपरिषदेसाठी विक्रमी मतदान

विधानपरिषदेसाठी विक्रमी मतदान

मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या सहा जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविण्यात आली. नागपूर, औरंगाबाद आणि पुणे पदवीधर या मतदारसंघांच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. पुणे शिक्षक मतदारसंघात गतवेळच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये तर जवळपास ८३ टक्के मतदान झाले. सर्व मतदारसंघाची मतमोजणी गुरुवारी होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारला एक वर्षपूर्ण झाल्यानंतर व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. यासाठी शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. तर भाजपने एकट्याने महाविकास आघाडीशी लढत दिली. त्याचबरोबर मनसे, वंचित आघाडी, प्रहार यांच्यासह बंडखोर उमेदवारांनीही निवडणुकीच चांगली रंगत आणली.
पुणे, नागपूर, आणि औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे व अमरावती शिक्षक अशा पाच मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान झाले. याशिवाय धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूकही पार पडली. सर्व सहाही मतदारसंघांतील मतमोजणी गुरुवारी होणार आहे. मतमोजणी ही पसंतीक्रमानुसार केली जात असल्याने निकाल जाहीर होण्यास दुसरा दिवस उजाडेल, अशीच चिन्हे आहेत.
करोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदारांना घरातून मतदान केंद्रावर आणण्यासाठी मेहनत घेतल्याने सर्वच मतदारसंघांमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात प्राथमिक अंदाजानुसार ६२ टक्के मतदान झाले. गत वेळी ३७ टक्के मतदान झाले होते. पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्या वेळी अवघे तीन टक्के मतदान झाले होते. यंदा भाजप आणि काॅ्ग्रेस अशी लढत झाल्याने तसेच सर्व पक्षांनी आपली ताकद लावल्याने ७० टक्के मतदान झाले. पुणे पदवीधर मतदारसंघामध्येही ५० टक्के मतदान झाले. गेल्या वेळी २२ टक्यांच्या आसपास मतदान झाले होते. पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत सरासरी ५५ टक्के मतदान झाले. मतदानाची ही टक्केवारी २००८ आणि २०१४ च्या निवडणुकीपेक्षा अधिक आहे. २००८ मध्ये ५२.५५ तर २०१४ मध्ये ३७ टक्के मतदान झाले होते.अमरावती शिक्षक मतदारसंघात तर ८३ टक्यांच्या आसपास मतदान झाले. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत एवढा प्रतिसाद कधीच मिळत नाही. या निवडणुकीमुळे सर्व पक्ष आणि नेत्यांची धाकधुक वाढवली आहे.

COMMENTS